न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२३) :- पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ असून, सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. भोसरी मतदारसंघ जिल्ह्यात चौथ्या स्थानावर आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तिन्ही मतदारसंघ आणि भोर मतदारसंघातील काही भाग मिळून असे १४ लाख ७६ हजार ४१८ मतदार आहेत.
जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ वर गेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्ता बदल करणे आदी कामे केली जाणार आहेत. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीवर ३० नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. २६ डिसेंबरला दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ जानेवारी २०१४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. हीच यादी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम असणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात सर्वाधिक संख्येचा संघ आहे. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात चौथ्या स्थानावर आहे. मार्च-२०२३ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. गेल्या आठ महिन्यांत तिन्ही विधानसभा मतदारसंघात ३९ हजार ३५ मतदार वाढले आहेत.
निवडणूक विभागाने अनेक उपक्रम राबविले होते. मावळ तालुक्यामध्ये सोसायट्यांमध्ये मतदान नोंदणीबाबत जागृती करण्यात आली होती. तसेच महाविद्यालयामध्येही नाव नोंदणीसाठी विशेष शिबिर घेण्यात आले होते. दुबार मतदारांची नावे कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेमुळे मतदानाचा टवका वाढला आहे.