- चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२३) :- दोघेजण पिस्टलसह पीडब्लूडी ग्राउंड, सांगवी या ठिकाणी आले आहेत अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या एका पथकाने सांगवी परिसरात सापळा लावला. दोन इसम ग्राउंडलगत बोलत थांबले असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी संशयित इसमांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते पळुन जावू लागले. पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडले.
१) हरीष काका भिंगारे (वय ३४ वर्षे धंदा- चालक रा. औंध रोड पुणे), २) गणेश बाळासाहेब कोतवाल (वय ३० वर्षे धंदा- चालक रा. नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे आढळली. ती जप्त करण्यात आली आहेत. सहा ते सात महीन्यापुर्वी मध्यप्रदेश येथे जावुन एकूण चार पिस्टल खरेदी करुन आणल्याचे व दोन पिस्टल पाषाण पुणे येथील त्यांचे मित्राला व एक पिस्टल पौड ता. मुळशी जि. पुणे येथील नातेवाईकाला दिल्याचे त्यांनी तपासात सांगितले. पाषाण पुणे येथुन ३) शुभम जगन्नाथ पोखरकर (वय ३० वर्षे रा. पाषाण पुणे) व पौड ता. मुळशी येथुन ४) अरविंद अशोक कांबळे (वय ४२ वर्षे, पौड ता. मुळशी जि.पुणे) येथुन सदर इसमांना दोन पिस्टल व ५ राउंडसह शिताफीने ताब्यात घेतले. असे एकूण ४ पिस्टल व १० राउंड जप्त केले आहेत.
मध्यप्रदेश येथुन पिस्टल खरेदी करुन आणण्याचा व जवळ बाळगण्याच्या उद्देशाबाबत तपास केला असता असे निष्पन्न झाले कि, आरोपी हरीष काका भिंगारे हा मुळचा उरावडे आंबेगाव ता. मुळशी येथील रहीवाशी असुन त्याचा तेथील स्थानिक इसमाशी शेत जमीनीच्या हक्कावरुन वाद आहे व त्याबाबत त्यांचेत भांडणतंटे झाले होते. हरीष भिंगारे व गणेश कोतवाल हे दोघे मित्र असुन त्यांनी मध्यप्रदेशच्या सिमाभागात जावुन ४ पिस्टल व राउंड खरेदी करुन आणले होते. दोन पिस्टल त्यांनी स्वत:जवळ ठेवून दोन पिस्टल त्यांच्या ओळखीच्या शुभम पोखरकर व अरविंद कांबळे यांचेकडे दिले होते.
आरोपींचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट २ कडून आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन ४ पिस्टल व १० राउंड जप्त करण्यात आले आहेत. अटक आरोपी यांचेकडे पिस्टल जवळ बाळगण्याच्या हेतू विषयी गुन्हे शाखा युनिट २ अधिक तपास करीत आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे ? श्री बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, नामदेव कापसे, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.













