- ग्रामस्थांच्या नाराजीमुळे मात्र, वारकरी संभ्रमात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- तीर्थक्षेत्र आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळा अर्थातच कार्तिकी यात्रेला आजपासून (दि. ५) सकाळी सातला महाद्वारातील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने प्रारंभ झाला आहे. एकादशीची मुख्य पहाटपूजा शनिवारी (दि. ९) तर माऊलींचा संजीवन सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला (दि. ११) पार पडणार आहे. दरम्यान सर्व अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज झाली असून नगरपालिका, देवस्थान, पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान आळंदीत कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी मुक्कामासाठी राहुट्या उभारण्यात मग्न आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा ७२७ वा संजीवन समाधी दिन सोहळा आहे. कार्तिकी वारीला तथा ‘श्री’च्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे पाच ते सहा लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीपलीकडच्या आगेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याशिवाय मंदिरालगत दोन मजली दर्शनकरी असून त्या ठिकाणीही भाविकांची दर्शनाला जाण्याची सोय आहे. यात्रा काळ घातपाताची शक्यता, चेंगरा चेंगरीसारखी घटना होऊ नये यासाठी दर्शनासाठी देऊळवाड्यावर आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाट सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक तपासणारी यंत्रण बसविण्यात आली आहे. माऊलींच्या मुख्य दर्शनानंतर महाद्वारातून भाविकांना बाहेर पडण्याचा मार्ग बनविण्यात आला.
मंदिरातील आजचे कार्यक्रम..
पहाटे ३ ते ५ या वेळेत अभिषेक व दुधारती, सकाळी ५ ते ११:३० भाविकांच्या महापूजा, सकाळी ७ ते ९ गुरु हैबतबाबांच्या पायरीची पूजा, दुपारी १२:३० ते १ महानैवेद्य, सायं. ६:३० ते ८ वीणा मंडपात हभप योगिराज ठाकूर यांचे कीर्तन, रात्री ८ ते ८:३० धुपारती, रात्री ९:०० ते ११ वीणा मंडपात हभप बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन, त्यानंतर हभप वासकर महाराज, हभप मारुतीबुवा कराडकर व हभप हैबतबाबा आरफळकर यांचा जागर.
आळंदी येथील विश्वस्तपदाच्या निवडीवरून आज आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत असून आळंदीकरांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे वारकरी संभ्रमावस्थेत आहेत. आळंदी येथील ग्रामस्थांच्या मुलाखती घेऊनही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर आजपर्यंत घेण्यात आलेले नाही. आळंदीतील समितीवर ग्रामस्थांना डावलल्याने आळंदी ग्रामस्थांकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज बंदची हाक देण्यात आली आहे.













