- राज्यभरात तेली बांधवांकडून तयारीला वेग.
- चाकणमध्ये जन्मस्थळी सर्वात मोठा कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती शुकवारी (दि. ८) रोजी साजरी होणार आहे. याबाबत रविवारी (दि. ३) रोजी श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे नियोजन सुदुंबरे येथे करण्यात आले होते.

बैठकीस श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, मुख्य चिटणीस अॅड. राजेश येवले, खनिजदार दत्तात्रय शेलार, उपाध्यक्ष पोपटराव पिंगळे, विजयकुमार शिंदे, चिटणीस लक्ष्मण शेलार, सतीश वैरागी, प्रशांत भागवत, शैलेश मखामले, भिकाजी भोज, पंडित पिंगळे, प्रदीप उबाळे, संदीप चिलेकर, सचिन काळे, संतोष काळे, महिला चिटणीस विमल वाव्हळ, व्यवस्थापक चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
पुढील महिन्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या पुण्यतीथीची जय्यत तयारी करावी. ८ डिसेंबरला होणारी महाराजांची जयंती सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी, त्यासाठी बांधवानी शासकीय कार्यालयास अवगत करावे. राज्यातील सर्वच भागात तेली बांधवांच्या वतीने जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पुढील महिन्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या पुण्यतीथीचीही यावेळी तयारी करण्यात आली. तेली बांधवानी मोठ्या संख्येने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
चाकणमध्ये जन्मस्थळी सर्वात मोठा कार्यक्रम..
‘श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंत्ती उत्सव सोहळा २०२३’ च्या वतीने चाकणमध्ये महाराजांच्या जन्मस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चाकणमधील श्री संत संताजीनगर येथे सकाळी ७.३० वा. श्री संताजी महाराज प्रतिमा पूजन, सकाळी.८.३० वा. ह.भ.प. रामचंद्र महाराज धाडगे, चाकण यांचे श्री संत संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत प्रवचन, सकाळी. १०.३० चाकण नगरपरिषद कार्यालयात शासकीय प्रतिमा पूजन, दुपारी १२.३० वा. नंतर अन्नप्रसाद कार्यक्रम, रात्री ९.०० वा. नंतर श्री शनैश्वर भजनी मंडळ चाकण, यांचे भजन होणार असून भव्य मिरवणूकीचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक सुभाष शिंदे यांनी दिली आहे.













