- तळवडे आग प्रकरण; महिलांच्या मुत्यूला पालिका प्रशासनदेखील तितकेच जबाबदार..
- पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या छाया सोळंके-जगदाळे यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- तळवड्यातील पत्राशेडमध्ये सुरु असलेल्या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या ६ कामगारांच्या वारसांना महापालिकेने देखील दहा लाख व जखमींना पाच लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या शहरातील नागरीकांच्या आरोग्याची, त्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटकांवर योग्य प्रकारे नियत्रंण ठेवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. पण सध्या महानगरपालिकेमध्ये या जबाबदारीकडे दुर्लक्ष करुन टक्केवारीची जबाबादारी सक्षमपणे पेलण्याकडेच माननीय आयुक्ताचे लक्ष असल्याचे दिसत आहे. यामुळेच महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांच्या कार्यकाळात आगीच्या घटना घडून जीवीतहानीचे प्रकार सततच घडत आहेत. गेल्याच महिऩ्यात निगडी येथील सेक्टर क्रमांक २२ येथील गोदामाला आग लागली होती, आकुर्डी येथी बीना इंग्लिश शाळेजवळ पुन्हा आग लागली होती, चिखली व कुदळवाडी परिसरात तर सततच मोठ्या आगीच्या घटना घडतात, पुर्णानगरमध्ये देखील हार्डवेअरच्या दुकानाला अशीच आग लागून होरपरुन चार जणांचा मुत्यू झाला होता. या सर्व घटना घडून देखील महापालिकेच्या अग्निशामक विभागाने व आयुक्त शेखर सिंह यांनी या सर्व प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. नेहमीसारखेच फक्त कारवाईचा फार्स दाखवत शहरातील व्यावसायीक गाळयांचे, दुकाने गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापऩा, मल्टीप्लेक्स अशा ९० हजार व्यावसायिक आस्थापणांची तपासणी केली होती. यामध्ये तळवडे येथीलआस्थापनेचा समावेश होता. यामुळे या फॅक्टरीचे देखील सर्वेक्षण झालेच असणार. तरी देखील या बाबत महापालिका प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे गंभिरपणे का पाहिले नाही.
महापालिका प्रशासनाने वेळीच या संदर्भात ठोस उपाययोजनेची पाऊले उचलली असती तर या ६ कामगारांचा जीव वाचला असता. यामुळे तळवडेमधील दुर्घटनेला व ६ कामगारांच्या मुत्यूला व जखमींच्या अवस्थेला सर्वस्वी महापालिकेचा आग्निशामक विभागाचेच साहाय्यक आयुक्त, अतिरीक्त आयुक्त व महापालिकेचे आयुक्तच जबाबदार आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने मृत्यू झालेल्या कामगारांना व जखमींना आर्थिक मदत द्यावी. अन्यथा महापालिका प्रशासनाने कायदेशीर लढाईला तयार रहावे, असाही इशारा छाया सोळंके-जगदाळे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.












