उर्वरित उमेदवारांनाही रूजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध १५ पदांसाठी एकूण ३८७ जागांसाठी नोकरी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील २१ उमेदवारांना सोमवारी (दि. १८) रुजू करून घेण्यात आले आहे. उर्वरित उमेदवारांनाही रूजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलिस व्हेरिफिकेशन) शारीरिक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) सुरू आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सोमवारी (दि. १८) सांगितले.
महापालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) व लिपिक तसेच, विभागीय अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी या उमेदवारांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर १ डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उमेदवारांना पोलिस व्हेरिफिकेशन व मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यासाठी ५ जानेवारी २०२४ पर्यंत सकाळी दहा वाजता महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लिपिक पदासाठीच्या इतर मागासवर्ग (महिला), खुला (खेळाडू), खुला (अनाथ), खुला (अंशकालीन) व ईडब्ल्यूएस (खेळाडू) या प्रवर्गातील उमेदवारांना पोलिस व्हेरिफिकेशनसाठी व मेडिकल तपासणी करून घेण्याबाबत स्वतंत्रपणे तारीख व वेळ अर्जावर नमूद केलेल्या मेलवर कळविण्यात येणार आहे, असे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले. तसेच, आज एकूण २१ कर्मचारी रूजू झाले आहेत.