- पालिकेकडून कारवाईचा केवळ फार्स…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टिक पिशव्या (कॅरीबॅग) यांची विक्री व उत्पादनाला बंदी आहे, तरीही त्याचा वापर होत आहे. महापालिकेकडून कारवाई थंडावली आहे. बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना प्लास्टिक पिशवी घेतली तर विक्रेत्याला पाच हजार तर ग्राहकाला पाचशे रुपये दंडापोटी मोजावे लागतात. दरम्यान प्लॅस्टिकचा सरसकट वापर केला जात आहे. पण अपवाद वगळता संबधित प्रशासनाकडून कारवाई होत नाही.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांबरोबरच नागरिकांवर कारवाई करून हा दंड वसूल केला जाणार असून त्यासाठी भरारी पथके महापालिका प्रशासनाने तयार केली आहेत. पहिल्यांदा विक्री करताना आढळून आला तर विक्रेत्यावर पाच हजार व नंतर परत तसाच प्रकार झाला तर २५ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दिली आहे. मात्र, या विभागाकडून तकलादू स्वरूपाची कारवाई होत असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रात प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग) उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. महापालिकेने २० फेब्रुवारी २०१० रोजी याबाबत ठरावही पारित केलेला आहे.