न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतूक शाखेमार्फत दर गुरुवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण २० टिमच्या माध्यमातून दर गुरुवारी २० शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, व्यसन न करणे, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आज गुरुवारी (दि. २१) रोजी तिसऱ्या टप्प्यात एकूण २० पथकांमार्फत २० शाळांमध्ये जावून ६६१५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमात आज पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डॉ. एन. जे. पवार कुलगुरु, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, पोलीस उप आयुक्त बापू बांगर व नरेंद्र कडू रजिस्ट्रार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांनी डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालय, पिंपरी येथे उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना एन.बी.टी मार्फतीने आयोजित पुणे बुक फेस्टिवल अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित “एक्झाम वॉरियर्स” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तदनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
“एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस दलामार्फत ६० शाळंमधील १८९९१ इतके विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, व्यसन न करणे, सायबर सुरक्षा च महिला सुरक्षा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्स्फुर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या उपक्रमाचा पुढील टप्पा (दि. २८) रोजी पार पडणार असून एकूण २० शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.