- कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगाराचा दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महेश महादेव चंदनशिवे ( रा. चिखली) असे खून सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. येरवडा कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या ४ जणांनी हत्या केल्याची माहिती मिळत आहे. या चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कात्रीने आणि धारदार हत्याराने गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.
येरवडा कारागृहात सर्कल क्र. दोनमधील बरॅक क्रमांक एकच्या आवारामध्ये गुरुवारी (दि. २८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली), महेश तुकाराम माने (२४), गणेश हनुमंत मोटे (२४, दोघेही रा. सांगवी), आदित्य संभाजी मुरे अशी संशयितांची नावे आहेत.
दरोड्याची तयारी करणे आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी २०२२ मध्ये महेश चंदनशिवे याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता. मृत महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये २०१३ ते २०२२ या कालावधीत १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.













