- आदेशावर खुलासा करा; संपूर्ण भाडेवाढ मागे घ्या..
- कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी थेटपणे नाट्यगृहांच्या भाडेवाढ बद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत व्यासपीठावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाने केलेली नाट्यगृहांची दरवाढ मागे घ्यावी. पूर्वीप्रमाणे भाडे ठेवावे, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले होते.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी त्यानुसार परिपत्रक काढून एक ते चार नुसार भाडेवाढ मागे घेतली आहे. परंतु, आयुक्तांनी काढलेल्या आदेशात एक ते चार नुसार म्हणजे नेमके काय? ही बाब स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने काढलेला हा आदेश अर्धवट वाटतो. याबाबत महापालिका आयुक्तांनी ताबडतोब खुलासा करावा. प्रशासनाने १० जानेवारी २०२३ रोजी लागू केलेले संपूर्ण परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड कलारंग संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेच्या वतीने केलेली चारपट भाडेवाढ, संगीत रंगभूमीची ५० टक्के भाडे सवलतीची योजना रद्द, सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमासाठी व्यावसायिक दराने भाडेवाढ याविषयी आवाज उठवला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने ५० टक्के दरवाढ मागे घेतली होती. मात्र, शंभर टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विविध संस्थांच्या वतीने करण्यात येत होती. तसेच दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात नाटक सादर करणार नाही, अशी भूमिका घेऊन बहिष्कार टाकला होता. त्याला आता यश मिळत आहे, अशी प्रतिक्रिया अमित गोरखे यांनी ‘न्यूज पीसीएमसी’शी बोलताना दिली.

















