न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे राज्यातील पहिला शून्य कचरा प्रकल्प उपक्रम राबविला आहे; पण त्या प्रकल्पाच्या शेजारीच महापालिकेचे काही कर्मचारी पत्ते खेळत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे महापालिकेने शून्य कचरा प्रकल्पाऐवजी जुगार अड्डा सुरू केलाय का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान त्यावर महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजावेळी जे कर्मचारी पत्ते खेळत असतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे शून्य कचरा प्रकल्प कार्यालयाशेजारी प्रशस्त कार्यालय, फॅन, खुर्च्छा, टेबल आणि सोबतीला काही सवंगडी घेत महापालिकेचे कर्मचारी जुगार खेळत असल्याचे मंगळवारी (दि. १६) आढळून आले. जुगार खेळणारे बहुतांश कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील आहेत. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील ड्रायव्हर, अतिक्रमणचे कर्मचारी, शिपाई, काही वर्ग तीनचे देखील कर्मचारी खेळण्यास येतात.











