शहरातील विकासकामांना नगराध्यक्षांची सर्वसाधारण सभेत मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- देहू नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज दुकानासमोर जाहिराती लावल्या जात होत्या. परंतु, यापुढे अशा जाहिरातींवर देहू नगरपंचायतीने ठरवून दिलेल्या ठिकाणी आणि नगरपंचायतीने जे दर दिले आहेत, त्यानुसार दर आकारणी होणार आहे.
नगरपंचायतीने ठरवून दिल्यानुसार बॅनर, होर्डिंग्ज लावावे लागणार आहेत. त्यावर क्यूआर कोड असणार आहे. जाहिरातदाराचे नाव, मुदत, प्रिंटिंग प्रेसचे नाव यांचा यामध्ये समावेश असणार आहे. महापुरुषांच्या दशक्रिया विधी जाहिरात बॅनरसाठी जाहिरात फलकाची मर्यादा असणार आहे. अशा ठरावासह वीस ते बावीस ठरावांना बुधवारी (दि. १७) देहूगाव नगरपंचायतीच्या झालेल्या सर्वसाधारण सभेस मंजुरी देण्यात आली.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यामध्ये एकूण २६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी २० ते २२ विषांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपाध्यक्ष सुधीर काळोखे, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
या विषयांना मंजुरी…
जयंती, देहू, माळीनगर, विठ्ठलनगरमधील मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक सुधारित भांडवली मूल्याप्रमाणे करआकारणी करणे. चतुर्थ वार्षिकीशाठी मालमत्ता वार्षिक करामध्ये शासन निर्णयानुसार शिक्षण व रोजगार हमी उपकराचा दर ठरविणे, अनधिकृत बांधकामांना दंड आकारून त्यांची नोंद करणे, लोकसेवा अधिनिमानुसार देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचे व इतर दाखल्यांचे दर निश्चित करून ते मंजूर करण्यात आले. देहु नगरपंचायत विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सुधारणा करून त्यास मान्यता देण्यात आली. पंचायतीकडून विविध अनुज्ञाती, व्यवसाय, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय नूतनीकरण करण्याबाबत व्यवसायाच्या अनुषंगाने शुल्क आकारणी करणे. महिला व बाल कल्याण समितीमार्फत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करणे आदी विषयासह मंजुरी देण्यात आली.











