- गडावरील प्लास्टिक गोळा करून लावली विल्हेवाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी रसाळगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पायथ्यापासून ते मंदिर परिसरापर्यंत पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल व खाऊच्या पदार्थाचे रॅपल्स असा अविघटनशील प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले. त्याचबरोबर लोकांनी गड किल्ल्यावर फिरताना सोबत आणलेला अन्नपदार्थ व खाऊचा कचरा आपल्या सोबत परत घेऊन जावा असे आवाहन करण्यात आले.
गड परिसरामध्ये अजूनही ऐतिहासिक ठिकाण आणि साहित्य यांची माहिती देणारे फलक पुरातन खात्याद्वारे लावण्यात आलेले नाहीत. याबाबत कोकण खेड युवाशक्ती द्वारे पुरातन खात्यास पत्रव्यवहार केला जाईल.
मोहिमेसाठी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश मोरे सचिव संदीप सकपाळ, कार्याध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष संदीप जाधव, सहखजिनदार नंदकुमार महाडिक, त्याचबरोबर कार्यकारणीचे सदस्य मधुकर कदम, संदीप साळुंखे, अभिजीत कदम, रोशन चाळके, अनिल कोकीकर, अरुण यादव, प्रा. संदीप कदम, सुधीर जाधव त्याचबरोबर स्थानिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











