- चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान केंद्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात मतदारांची संख्याही वाढत आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात तसेच, भोर मतदार संघातील ताथवडे भाग असे एकूण १५ लाख २० हजार ८८० मतदार आहेत. तर, चिंचवड मतदार संघ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. एकूण ३६ हजार ६२२ मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २३ जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पिंपरी मतदार संघात ३ लाख ६४ हजार ८०६ मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५ लाख ९५ हजार ४०८ मतदार आहेत तर भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख ३५ हजार ६६६ मतदार आहेत. शहरात एकूण ८ लाख २ हजार १६० पुरुष, ६ लाख ९३ हजार ५५९ महिला आणि १६१ तृतीयपंथी मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या एक लाख ९ हजाराने कमी आहे.
या मतदार यादीतून दुबार नावे, मयताचे नावे, समान छायाचित्र असलेली नावे स्थलांतरीत मतदार पांची नावे वगळण्यात आली आहेत. यंदा १८ ते २० या वयोगटातील मतदार संख्या वाढली आहे. चिंचवड मतदार संघात ५ हजार ६३ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण २९ हजार ७१६ जणांनी नोंदणी झाली आहे. तर, भोसरी मतदार संघात ८ हजार ८०८ मतदारांची संख्या वाढली आहे. त्यात २ हजार ५१९ हे १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आहेत. तर, पिंपरी मतदार संघात एकूण ६ हजार मतदारांची नोंदणी वाढली आहे.
पिंपरी, चिचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या १४ लाख ९५ हजार ८८० इतकी आहे. भोर विधानसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे गावाचा भाग समावेश आहे. तेथे सुमारे २५ हजार मतदार संख्या आहे. ती मतदार संख्या धरल्यास पिंपरी-चिंचवड शहराची एकूण मतदार संख्या १५ लाख २० हजार ८८० इतकी होते. चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदान केंद्र ५१० आहेत, तर, भोसरी मतदार संघात एकूण ४६४ मतदार केंद्र आहेत. पिंपरी मतदार संघात एकूण ३९९ केंद्र आहेत.