- मुकाई चौकापर्यंतचा रस्त्ता अपूर्णावस्थेत; अपघातांना आयेतच आमंत्रण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर रावेत पूल नागरिकांना वापरण्यास खुला करण्यात आला. परंतु, पुलापासून मुकाई चौकापर्यंतचे डांबरी रस्त्याचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या मार्गावर वाहनचालकांच्या अपघातामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू आहे. वाहनांचा वेग जास्त असल्याने व पुढच्या रस्त्याच्या भागात काम सुरू असल्याने वाहनचालक गोंधळून जात असल्याचे सध्या चित्र आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्याने प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे पदाधिकारी व रस्ता सुरक्षा तज्ञ संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, अर्चना घाळी दाभोळकर, विजय मुनोत, सतीश देधमुख, गौरी सरोदे यांनी अपघात ठिकाणांची पाहणी केली. त्यांना या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या. जोपर्यंत मुकाई चौकाच्या परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही; तोपर्यंत वाहनचालकांनी वाहने जपून चालवावत, शक्य झाल्यास काम पूर्ण झाल्यावरच हा मार्ग वापरावा, असे आवाहन त्यांनी वाहनचालकांना केले आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करून रावेत पुलाच्या उदघाटन घाईने उरकण्यात आले. राजकीय सुंदोपसुंदी व श्रेयवादाची लढाई याचा प्रत्यक्ष प्रत्यय मागील आठवड्यात दिसून आला. कामाबाबत पालकमंत्री अजित दादांनाही पालिका प्रशासनाने अंधारात ठेवले. काम अपूर्ण असल्याचे दादांना लक्षात आणून देण्याचे सोपस्कर कोणीही न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात दादा अश्या विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमाबाबत कोणता निर्णय घेतात? ह्याकडे पिंपरी चिंचवडवासियांचे लक्ष नक्की असणार यात शंका नाही.
विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण म्हणाले,” दोन दिवसांमध्ये आतापर्यंत तीन अपघात ह्या रस्त्यावर झाल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी परिसरातील रहिवाशी नागरिकांची मागणी आहे.”














