न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीनीकरण होणार हा खूप जुनाच मुद्दा आहे. पालिकेची दिरंगाई व कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आळशीपणा यामुळे ही कार्यवाही रखडली होती. मात्र नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील बैठकीत देहू रोड कॅन्टोन्मेंट विषयी विचारणा करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा गती आली आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीनीकरण होईल, अशी चर्चा अधिकारी वर्गात सुरू आहे.
देशातील कॅन्टोन्मेंट बोर्ड परवडत नसल्याने किंबहुना जीएसटी आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जकात नाके बंद केल्यामुळे उत्पनाचे साधन उरले नाही. त्यामुळे हे कॅन्टोन्मेंट बोर्ड जवळच्या महापालिकेत समाविष्ट करण्याचे निश्चित झाले. ही प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत फतेहगड, डेहराडून, शहाजानपुर, क्लीमेंट टाउन, रामगड, मधुरा, देवळाली, बबीना, मोरार, नशिराबाद, अजमेर आणि सागर हे एकूण बारा कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. दिनांक १३ फेब्रुवारी पासून येथे कॅन्टोन्मेंट बोर्ड असे नाव झळकणार नाही, असे आदेश अरविंद कुमार द्विवेदी डायरेक्टर जनरल ऑफ कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी दिले आहेत.
याच काळात खड़की व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश व्हावा म्हणून हालचालींना वेग आला होता. त्याप्रमाणे हे दोन्ही बोर्ड समाविष्ट करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत, याच काळात संभाजीनगर आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची कागदपत्रे तपासण्याची मागणी केली होती. त्यामुळे देहुरोड कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत होणार आहे हे निश्चित आहे.
दरम्यान या विलिनीकरणाला काही सामाजिक व राजकीय संघटनांनी विरोध केला आहे. कॅन्टोमेंट बोर्डाचे अस्तित्व कायम राहावे, अशी त्यांची मागणी आहे. महापालिकेनेही या परिसराची पाहणी केली होती. मात्र देहूरोड परिसरातील कॅन्टोमेंटच्या हद्दीतील मोकळ्या जागा देण्यास तयार नाहीत, त्यामुळे भविष्यात येथील उद्यान, क्रीडांगण व इतर सोयी सुविधा नागरिकांना कशा द्यायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे, मोकळ्या जागा मिळणार नसल्याने कॅन्टोमेंटचा हा परिसर घेण्यासाठी महापालिकाही उत्सुक नसल्याचे समजले. मात्र केंद्र शासन स्तरावरून आदेश आल्यानंतर महापालिकेलाही कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील हा परिसर घ्यावाच लागणार आहे.















