न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- भाजपाची प्रदेश कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. वर्षभरात भाजपच्या शहर कार्यकारणीमध्ये आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना संधी देण्यात आली नव्हती. मात्र, आता शहरात नव्हे तर थेट प्रदेश कार्यकारणीत त्यांच्या समर्थकाची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार अश्विनी जगताप समर्थक राज हेमंत तापकीर यांची पक्षश्रेष्ठींकडून निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात त्यांनी आज गुरुवारी पदभार स्विकारला आहे.
आमदार अश्विनी जगताप यांनी राज तापकीर यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळवुन देण्यासह पक्षाची ध्येयधोरणे, विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निवडीबद्दल राज तापकीर म्हणाले, ‘राजकारणात सक्रिय झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत मनापासून भारतीय जनता पक्षाचे काम केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अश्विनीताई जगताप यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र काम केले. त्याचेच आज फळ मिळाले’.











