न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडी रेकनर दरात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. रेडी रेकनर दरात वाढ झाल्यास घरांच्या किमती वाढून गृहखरेदी दारांसोबतच बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर देखील ताण वाढेल. यामुळे रेडी रेकनर दरात बदल करू नये, अशी मागणी बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी केली आहे.
पुण्याचा विचार केल्यास रेडी रेकनर दरात ५ ते ८ टक्के इतकी वाढ झाली तर मुद्रांक शुल्कही वाढेल आणि घरांच्या किमतीत देखील किमान २ ते ५ लाख रुपये इतकी थेट वाढ होईल, असा अंदाज आहे. या सर्व बाबी विचारात घेता रेडी रेकनर दरात वाढ न करता ते स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी क्रेडाई पुणे ची भूमिका आहे.
पुण्याच्या दृष्टीने विचार केल्यास बांधकाम व्यवसाय क्षेत्रात सातत्याने प्रगती करणारे तरीही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत परवडणारे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. २०१९ च्या तुलनेत २०२३ या वर्षांत देशातील सर्वांत वेगाने वाढणारे रिअल इस्टेट मार्केट म्हणून आज पुणे समोर आले आहे. पुणे विभागात २०२३ या वर्षात देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ९० हजार घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी रेडी रेकनर दर स्थिर असल्याने दस्त नोंदणीत वाढ झाली असून ११ महिन्यात राज्याला ४२ हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागातील सरासरी घरांच्या किमतीचा विचार केला तर ही किंमत ६४ लाख रुपये इतकी आहे. रेडी रेकनरचे दर वाढल्यानंतर घरांच्या किमती वाढून पुणे हे परवडणारे शहर राहणार नाही हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवे आहे. यासंदर्भात राज्य सरकार व संबंधित विभाग यांच्याशी आम्ही संवाद साधत आहोत, अशी माहितीही नाईकनवरे यांनी दिली.