न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वात मोठा धक्का दिला. चेन्नईचा नियमित कर्णधार एम एस धोनीने त्याचे कर्णधारपद युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवा कर्णधार हा पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील मराठमोळा ऋतुराज गायकवाड असणार आहे.
सीएसकेचा पहिला सामना शुक्रवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध होणार आहे. कॅप्टन्सच्या फोटोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी धोनी सीएसकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना दिसणार असून ऋतुराज त्याच्या देखरेखीखाली ही जबाबदारी सांभाळणार आहे.
धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कर्णधारांच्या फोटोशूटलाही हजेरी लावली नाही. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड दिसला, तेव्हापासून CSK च्या कर्णधार बदलाची चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी आयपीएलने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये पुष्टी केली की धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी पंजाब किंग्जनेही मोठा निर्णय घेत जितेश शर्माला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. शिखर धवनच्या जागी तो कर्णधारांसोबत फोटोशूट करताना दिसला.













