- भर रस्त्यात एकाला लुटले; लोकांच्या जमावावर कोयता भिरकावला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- ‘ए थांब, कुठे जातो? असे म्हणत आरोपीने फिर्यादीकडे पाचशे रुपयांची मागणी केली. फिर्यादीने आरोपीला माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. त्यामुळे चिडुन जावुन फिर्यादीला त्यांनी शिविगाळ केली. ‘तुला पहिल्यांदाच पैसे मागतोय तर, तु मला नाही म्हणतोस, तुला लई माज आलाय’ असे म्हणत फिर्यादीची गचांडी धरुन त्याना हाताने मारहाण केली.
आरोपीने मित्राला “महाद्या कोयता दे रे” असे म्हणताच त्याने त्याच्या शर्टच्या आतुन एक लोखंडी कोयता बाहेर काढून आरोपी मित्राच्या हातामध्ये दिला. त्याने फिर्यादीवर कोयता उगारुन, त्यांना घाबरवून त्यांच्या पॅटच्या खिश्यात जबरदस्तीने हात घालुन खिश्यातील ९०० रुपये काढून घेतले. त्यांना जोरात ढकलुन दिल्याने ते खाली पडले. आरोपीच्या मित्राने फिर्यादीला लाथांनी मारहाण करुन दुखापत केली. तेव्हा रस्त्याने जाणारे लोक फिर्यादीच्या मदतीसाठी थांबले असता आरोपीने कोयता हवेत फिरवुन लोकांना “इथे कोणी थांबला तर कापून टाकीन” असे म्हणून दहशत निर्माण केल्याने घाबरलेले लोक त्यांना घाबरुन निघुन गेले. त्यानंतर ते दोघे त्यांच्या दुचाकीवर बसुन कोयता हवेत फिरवत शरदनगरच्या दिशेने निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५) रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास शालीमार मॅट्रेस अॅन्ड फर्निचर, या दुकानासमोर स्पाईन रोडच्या शरदनगर बाजुकडील सर्व्हिस रोडवर, स्पाईन रोड, चिखली येथे घडली. फिर्यादी राजकुमार महादेव कल्याणी (वय २४ वर्षे, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी आरोपी प्रकाश ऊर्फ गणेश श्रीगोंड (रा. काळेवाडी, पिंपरी) व त्याचा साथीदार २) महादेव (पुर्णनाव-पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलिसांनी १७३/२०२४ भा.दंविकलम ३९४, ३४ क्रिमिनल अमेंटमेंट अॅक्ट कलम ७, मार्म अॅक्ट ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) सह-१३५ प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.