न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. २२) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. श्रीरंग बारणे आणि त्यांची पत्नी सरिता यांची एकत्रित संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे. गेल्या पाच वर्षांत बारणे यांची ३० कोटींनी संपत्ती वाढली आहे.
बारणेंनी प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी व्यवसाय म्हणून शेती, वीट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यावर्षी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात १ अब्ज ३१ कोटी ८५ लाख ९१ हजार ६३१ रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. तसेच ८५ लाख रूपये कर्ज असल्याचाही उल्लेख केला आहे.
२०१९ ला श्रीरंग बारणे यांच्याकडे जंगम मालमत्ता १३ कोटी २० लाख ८८ हजार ९६४ रुपये, तर पत्नी सरिता बारणे यांच्या नावावर ५७ लाख ५ हजार ६४६ रुपये वारसाप्राप्तासह एकूण संपत्ती एक अब्ज २ कोटी ३३ लाख १० हजार १३४ रुपये होती, तर ४ लाख १६ हजार ६१२ रुपयांचे कर्ज होते.
२०१४ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबांने ६६ कोटी २४ लाख ४१ हजार ४०४ रुपये एवढी आपली मालमत्ता दाखविली होती. त्यात श्रीरंग बारणे यांची ५२ कोटी ४३ लाख २९ हजार २०९ रुपयांची, तर पत्नी सरिता यांची १३ कोटी ९९ हजार ७२५ रुपयांची प्रॉपर्टी होती. जंगमपेक्षा स्थावर मालमत्ता त्यांची बहुतांश आहे. वेंब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि मर्सिडीज बेंझ, ऑडी, फॉर्च्यूनर, आय २० अशा चार आलिशान मोटारी त्यांच्याकडे त्यावेळी होत्या.