- खासगी टँकर चालकांना देखील पालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणे, रस्ते धुणे, घर, सोसायटी परिसर धुणे यासाठी वापर केला जात असेल तर त्या नागरिकांना प्रथमतः नोटीस बजाविण्यात येईल. त्यानंतरही दुसऱ्यांदा असा पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास पालिका पथकाकडून तत्काळ नळजोड तोडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच महापालिकेच्या टाक्यांवर पाणी भरून खासगी टँकर पाणी विकत असतील तर त्यांच्यावरही महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळणे आवश्यक आहे. तसेच सर्व सोसायटीधारकांनी एसटीपी आणि बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, सोसायटीअंतर्गत उद्यान, परिसराची स्वच्छतेसाठी वापरावे. पिण्याचे पाणी वाहने स्वच्छ करण्याकरिता वापरू नका. अंगण, जिने किंवा फरशी धुणे टाळा, स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करा.
महापालिकेच्या टाक्या अथवा इतर पाणवठ्यांवर खासगी टँकर भरले जात नाहीत. तसे आढळल्यास त्या परिसरातील स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरात पाणी ज्या ठिकाणी पोहचले नाही. त्या ठिकाणी महापालिकेचे टँकर पाणी पुरवठा करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीटंचाई असेल तर तातडीने महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
उन्हाळा सुरु झालेला आहे. पावसाळा जूनमध्ये सुरू होईलच, याची शाश्वती नाही. पावसाळा विलंबाने सुरू झाल्यास शहरात पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. सर्व नागरिकांनी आतापासूनच काटकसरीने व जपून पाणी वापरणे अत्यावश्यक आहे.
– श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, महापालिका…