न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिरनेर प्रतिनिधी : चिरनेरचा सर्वांगिण विकास करणे ही खरी हुतात्म्यांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चिरनेर येथे केले. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन मंगळवार २५ रोजी चिरनेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बारणे यांनी चिरनेरच्या विकासासाठी आपल्या खासदार निधीतून २० लाख रूपये देण्याचीही घोषणा केली.
२५ सप्टेंबर १९३० साली चिरनेर येथे ब्रिटीशांच्या राजवटी विरोधात सत्याग्रह झाला होता. त्याचा स्मृतिदिन चिरनेर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पोलीस पथकाकडून बंदुकीच्या फैरी हवेत झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यभरातील अनेक मान्यवर येत असतात. रायगड जिल्हा परिषद या कार्यक्रमासाठी आर्थिक व्यवस्था करत असते. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच दरवर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात. मात्र यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व प्रमुख अतिथी म्हणून येणार असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षांनीच कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल पालकमंत्र्यांवर सडकून टिका केली. पालकमंत्र्यांनी निमंत्रणाची वाट न पहाता हा कार्यक्रम स्वतः साजरा केला पाहिजे. यासाठी शासनाकडून भरिव अर्थिक तरतूद करायला हवी, असेही त्यांनी सांगितले. या सत्याग्रहाचे एवढे महत्व आहे की, चिरनेर जंगल सत्याग्रहाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात शिकविला जायला हवा. येत्या हिवाळी अधिवेशनात त्याबाबत चर्चा घडवून मुख्यमंत्र्यांना उत्तर देणे भाग पाडू असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, इंटकचे महेंद्र घरत यांची भाषणे झाली. यावेळी सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून चिरनेरच्या विकासासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, असे सर्वांनी सुचविले. चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ८८ व्या स्मृतिदिनी हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी खा. श्रीरंग बारणे, आ.जयंत पाटील, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, आ.मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उरणचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, इंटकचे महेंद्र घरत, उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे, जि. प. सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, विजय भोईर, पं स सदस्य दिपक ठाकूर, सागर कडू, गटविकास अधिकारी निलम गाडे इत्यादी मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते
















