- शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात अग्निशामक केंद्राची भासतेय निकड..
- भाजपचे अमित गोरखे यांच्याकडून मुद्दा ऐरणीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- शाहूनगर ,संभाजीनगर ,पूर्णा नगर ,एचडीएफसी कॉलनी या भागात सातत्याने आग लागण्याची घटना होत असून गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी ४ मोठ्या आगीच्या घटना घडलेल्या आहेत. पूर्णानगरमध्ये तर फर्निचरचे दुकान जागीच खाक होऊन चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अजूनही ताजी आहे. त्यानंतर शाहूनगर परिसरात लोकवस्तीत इमारतीमध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात आज पुन्हा शॉक सर्किट होऊन शाहूनगरमधील एका इमारतीच्या फ्लॅटला मोठ्या प्रमाणात आग लागली.
येथे आगीची घटना घडल्यानंतर आगीचा अग्निशामक बंब पोहोचायला बराच वेळ लागतो. निगडी तथा संत तुकाराम नगर या ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. त्यामध्ये अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अग्निशामकाचा बंब यायला लागतो. त्यामुळे आग भडकू शकते. शाहूनगर, संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी तथा पूर्णा नगर, घरकुल ,साने वस्ती, कुदळवाडी हा परिसर लोक वस्तीने भरलेला असून या ठिकाणी अनेकदा एमआयडीसीचा भाग असल्यामुळे कंपन्यांनाही आग लागलेली आहे. याचा आयुक्तांनी गांभीर्यपूर्वक विचार करून तातडीने या भागातील जमिनींचा सर्वे करून या ठिकाणी अग्निशामक केंद्र तात्काळ कसे सुरु करता येईल यासाठी गांभीर्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी भाजपा पिंपरी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
आजही शाहूनगर मधील एका सोसायटीच्या फ्लॅटला आग लागली असून आगीचे बंब पाचारण करायला अर्धा तास पेक्षा जास्त वेळ गेल्यामुळे फ्लॅट मधील सर्व काही सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु, हा भाग एमआयडीसी तथा कंपन्यांनी भरलेला असून कामगार वर्ग या भागात जास्त राहतो. त्यामुळे येथे अग्निशामक केंद्राची गरज असल्याने याचा विचार तातडीने व्हावा, असेही पत्रात म्हटले आहे.











