न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :- पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा हाकनाक बळी गेला. पोर्श या गाडीने या जोडप्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. ही पोर्श गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा हा मुलगा असल्याचं समोर आलं आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आता बार मालकासह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असताना त्याला दारु देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. युद्धपातळीवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सामग्री, अल्कोहोल आदी सर्व दृष्टीकोनातून चौकशी करण्यात येणार. या प्रकरणातील कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ब्लडचे रिपोर्ट आलेले नाहीत”, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.
आरोपीने मद्यप्राशन केले होते, दोन्ही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात ते मद्यप्राशन करताना दिसत आहेत. त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे. ही दारूची ऑनलाईन पेमेंट आहेत. यातून स्पष्ट झालंय की त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. परंतु, रक्ताचा अहवाल आल्यानंतरच याचा खुलासा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोन आले होते. पोलीस महासंचालक यांनीही सूचना दिली आहे. सर्वांची सूचना स्पष्ट आहे की पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रशासकीय कारवाई करत नाही तोवर दोषी आहेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हायला पाहिजे”, असंही ते म्हणाले.















