न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबद्ध पध्दतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. यासाठी सातत्याने स्थळ पाहणी करुन पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पावसाळापुर्व कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध भागातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली. तसेच पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता रामदास तांबे, उप आयुक्त आण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता एस. टी. जावरानी, सुनील बेळगावकर, राजेंद्र शिंदे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, कंचनकुमार इंदलकर, राजेश भाट तसेच इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात पावसामुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांचे पूर्व नियोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम पुर्णत्वावर आले आहे. अ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत २५ नाले, ब क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १५ नाले, क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत २९ नाले, ड क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १२ नाले तसेच इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १६ नाले, फ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १८ नाले, ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ९ नाले तर ह क्षेत्रीय कार्यालयातंर्गत २० नाले असे एकूण १४४ नाले महापालिका हद्दीमध्ये आहेत.
या पाहणी दौऱ्यादरम्यान मिल्कमेड बेकरी चिंचवड, आकुर्डी रुग्णालय, बजाज कंपनी समोरील सबवे, निगडी उड्डाण पुल, माता अमृतानंदमयी शाळा, राधा स्वामी सत्संग भवन, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी उड्डाण पुल धावडे वस्तीकडील उतार, पीसीएमची चौक, आदिनाथ नगर, आदिनाथ सोसायटीजवळील महामार्गाचा भाग येथील नाल्यांची तसेच संभाव्य पाणी साठणाऱ्या भागांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली. तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याकरीता पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.