- शहरात आलेल्या देशभरातील ट्रक चालकांची गैरसोय संपणार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२४) :- पिंपरी-चिंचवड, तळेगाव एमआयडीसीतून उत्पादित केलेला माल राज्यासह देशभरात जातो. त्यामुळे इथे कच्चा तसेच पक्का माल नेण्यासाठी मोठ्या वाहनांची ये-जा ठरलेलीच असते. मात्र, या वाहनांना उभे राहण्यासाठी तसेच चालकांना विश्रांतीसाठी शहरात एकही ट्रक टर्मिनल नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे ट्रक टर्मिनसची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील व एमआयडीसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, तसेच वाहनचालकांनाही विश्रांती करण्यासाठी हक्कांची जागा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात ऑटोमोबाइल क्षेत्र, केमिकल आदी उद्योग व त्यांना कच्चा माल पुरवठा करण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ट्रकद्वारे सुरू असते. या वाहनांसाठी टर्मिनस नसल्याने चालक परिसरालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहने उभी करतात. बऱ्याचदा कंपनीतील सामानाचे लोडिंग अवजड वाहनांमध्ये दुपारनंतर केले जाते. त्यामुळे ही अवजड वाहने संध्याकाळपर्यंत रस्त्याच्या किंवा महामार्गाच्या कडेला उभी असतात. तसेच चालक त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय स्वत: करत असतात. त्यामुळे त्यांना जेवण तयार करण्याचे सामान सोबत ठेवावे लागते. वाहनचालकांच्या या बाबी लक्षात घेऊन हे ट्रक टर्मिनस तयार करण्यात येत आहे. शहरातून ट्रक, ट्रेलरची वाहतूक होते. ही मोठी वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र, ट्रक टर्मिनस झाल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत. यामुळे महामार्गावर तसेच सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोडीचा प्रश्न सुटणार आहे.
हे ट्रक टर्मिनस दोन फेजमध्ये विभागले गेले आहे. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय महामार्गालगत एएम (अॅम्युनिटी) १४ येथे फेज १ तर एएम ५ येथे फेज २ चे काम सुरू आहे. फेज १ मध्ये १० हजार ६८९ चौ. मी तर फेज २ मध्ये ४० हजार २१३ चौरस मीटर इतक्या जागेमध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. ट्रक टर्मिनसमध्ये २ मजली इमारतीचे नियोजन आहे. त्यामध्ये पहिल्या मजल्यावर उपाहारगृह, पंक्चर, गाडीसंदर्भात इतर सुविधा देणाऱ्या आस्थापना असणार आहेत, तर दुसऱ्या मजल्यावर आरामासाठी खोल्या असतील. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा कर्मचारी नेमण्यात येणार आहे. ट्रक टर्मिनसचे काम ६ महिन्यांत पूर्ण होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढून भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. यासाठी उद्योजक, वाहनचालक, वाहनमालक यांच्या संस्था व संघटनांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर याचे दर तसेच इतर विविध बाबींवर निर्णय घेण्यात येणार आहे.
देशभरात कुठेही प्रवास करावा लागतो. त्यामुळे आराम मिळणे गरजेचे असते. शहरात मुख्य रस्त्यालगत ट्रक टर्मिनल्स असल्यास चालकांना विविध सुविधा मिळतील. ज्यामुळे गाडी चालवताना ताण येणार नाही. चालकांना विश्रांती मिळाल्यास अपघातांचीही संख्य कमी होईल, अशी प्रतिक्रिया ट्रकचालकांनी दिली.















