- त्या कामगारांचे थकीत वेतन मिळणार आज
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- मेट्रोची ठेकेदार कंपनी एच. सी. सी. अल्फा इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. जे. व्ही. या कंपनीतील कामगारांना पाच महिन्यांच्या थकीत पगारापैकी तीन महिन्यांचा पगार आज शुक्रवार (दि. ३) रोजी दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम पंधरा-पंधरा दिवसांनी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
आज चेकवाटप झाल्यानंतर कामगार उपोषण मागे घेणार आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यासाठी शिष्टाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स येथे स्टेशनचे काम जोरात सुरू असून, मेट्राने ते काम एच. सी. सी. अल्फा इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा.लि. जे. व्ही. यांना दिले आहे. या कपनीत विविध विभागात सुमारे १०० कामगार काम करत असून, या कामगारांना डिसेंबर २०१८ पासून आजपर्यंत पगार दिलेला नाही. काही जणांना दोन महिन्यांचा पगार देऊन राजीनामा घेण्यात आला आहे. काही जणांना निलंबित करण्यात आले, त्यामुळे कामगारानीं १ मे पासून बेमुदत उपोषण सुरू केले.
या प्रश्नी बुधवारी (दि. २) रोजी साने, कलाटे, भापकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. कामगार व कंपनीचे प्रोजेक्ट संचालक अनिल बिराजदार यांच्याशी एकत्रित चर्चा केली. सुरुवातीस बिराजदार यांनी एच. सी. सी. अल्फा इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. कंपनीकडे पैसे नाहीत. कामगारांना शुक्रवारी दोन महिन्यांचा पगार देतो. बाकी थकीत रक्कम देण्यासाठी वेळ द्यावा, दर पंधरा दिवसांनी उरलेली रक्कम दिली जाईल अशी भूमिका घेतली.
मात्र साने, कलाटे, भापकर, आक्रमक झाल्याने अखेर तीन महिन्यांचा पगार आज (शुक्रवारी) दिला जाईल. उरलेली रक्कम पंधरा-पंधरा दिवसांनी देण्याचे बिराजदार यांनी व्यवस्थापनाच्या वतीने मान्य केले. तसेच ज्या कामगारांचे राजीनामे घेण्यात आले व ज्यांना एक अथवा तीन दोन महिन्यांचा पगार दिला आहे. त्या कामगारांनाही आज पंधरा महिन्यांच्या पगाराप्रमाणे उरलेली रक्कम दिली जाणार आहे.











