न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- २८ जुन २०२४ रोजी जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ३३९ वे आषाढी वारी प्रस्थान पंढरपूर कडे होणार आहे. १९ दिवसांचा हा सोहळा महाराष्ट्र राज्य तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. ह्या पालखीमध्येच अनेक संतांच्या पालख्या सुद्धा सामील होत असतात. साधारण २६० की.मी चा पंढरपूरचा प्रवास १९ दिवसांमध्ये ह्या पालख्या गाव वाड्यां वस्त्यांमधून मार्गक्रमण करीत असतात. याकरिता राज्यातून शेकडो दिंड्या देहूमध्ये २ दिवस अगोदरपासून दाखल होत असतात. ह्या पालखी सोहळ्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे चे १५० पेक्षा जास्त स्वयंसेवक पोलीस प्रशासनास सुरक्षा हेतू सहाय्य करीत असतात. संस्थेचे यंदाचे २२ वे वर्ष आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये पीएनएसकेएस संस्थेचे स्वयंसेवक, पोलीस मित्र, एसपीओ यांची महत्वपूर्ण पालखी सुरक्षा नियोजन बैठक देहूरोड पोलीस ठाणे येथे पार पडली. बैठकीस प्रमुख उपस्थिती देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, एल आय बी विभागाचे अजित सावंत, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, राम सुर्वे, अंकुश घारे, गौरी सरोदे, बळीराम शेवते यांची होती.
या प्रसंगी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे म्हणाले,” दरवर्षीप्रमाणे यंदाचा पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या एसपीओ व पोलीस मित्रांची भूमिका ही महत्वाची असणार आहे. ह्या सर्व एसपीओ ,पदाधिकाऱ्यांचा गेल्या २१ वर्षांपासून असणारा बंदोबस्त अनुभव तसेच सुरक्षा हेतु त्यांनी अनुभववलेल्या ग्राउंड झिरो च्या बाबी ह्या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास करून यंदाचे पालखी नियोजन करण्यात येणार आहे. नागरी सहभाग, आपल्या पीएनएसकेएस सारख्या स्वयंसेवी संस्था,होमगार्ड या सर्वांच्या एकत्रित सहभागाने पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्यअध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,”पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता महाद्वार परिसर, मंदिर प्रदक्षिणा परिसर, शिळा मंदिर परिसर, टाळकरी कमान द्वार परिसर, नदी घाट ,इनामदार वाडा परीसर, मुख्य देहू द्वार कमान परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, अनगडशाह दर्गा परिसर, परंडवाल चौक या प्रमुख ठिकाणी पीएनएसकेएस संस्थेचे सदस्य एसपीओ वारकऱ्यांची सेवा तसेच त्यांना वैदयकीय मदत तसेच संयुक्त सुरक्षा मदतहेतू कार्यरत असणार आहेत यंदाच्या वर्षी १५० स्वयंसेवक पालखी सोहळ्याकरिता प्रशासनास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या बैठकीस “पीएनएसकेस” संस्थेचे तेजस सकट, राजकुमार कांबिकर, सातप्पा पाटील, प्रशांत जमदाडे, रवींद्र पवार,विजय जगताप, प्रकाश सुतार, रवींद्र जांभळे, उमेश देशमुख,अरुण रामटेके, प्रेम भोसले, शंकर सूर्यवंशी, सुरेश वायकर, रामनारायन सुर्वे, रोशन हांडे, अभिजीत जोशी, संजय गोरखा, प्रतीक अनारसे,कुलदीप डांगे, मंगेश सकपाळ, रमजान पटेल हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविक अजित सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे यांनी केले.