- भटक्या समाजाचं बेकायदेशीर वास्तव्य अनं टपरीचालकांच अतिक्रमण..
- वारीतील वारकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२४) :- निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखालील पार्किंगमध्ये टपरीधारक आणि फासे पारधी समाजाने अतिक्रमण करून तिथे वास्तव्य सुरु केले आहे. त्यामुळे वारीतील वारकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करून येथील जागा वारकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राहुल महिवाल यांनी निगडी परिसरात पाहणी दौरा केला होता. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखालील पार्किंगमध्ये फासेपारधी समाजातील नागरिक वास्तव करीत आहेत. त्यामुळे बकालपणा निर्माण झाला आहे. तेथील पार्किंग बंद असूनसुद्धा बेकायदेशीरपणे पार्किंग सुरू असून गाड्या लावण्यात येत आहेत.
दरम्यान प्रशासनाचे अधिकारी झोपेत आहेत. त्यामुळे वारकरी बांधवांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आयुक्तांनी ताबडतोब हस्तक्षेप करून सदर जागा मोकळी करून तिथे फिरते शौचालय, पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच आजूबाजूच्या परिसरात औषध फवारणी करावी. जेणेकरून वारकरी बांधवांना मुकाम करण्यासाठी उड्डाणपूलाखालील पार्किंगमध्ये जागा उपलब्ध होईल, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.












