न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- चोरीची अॅटो रिक्षा घेवून ओटास्कीम, निगडी भागात फिरत असल्याची खात्रीशीर माहीती पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली. त्यानुसार कारवाई करून सराईत रिक्षा चोरास अटक करीत त्याच्याकडून चार चोरीच्या रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गणेश दत्तु सुर्यवंशी (वय ३० वर्षे रा. ओटास्किम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
संशयित इसम भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी चौक रस्त्यावर रिक्षा सुसाट चालवित असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो भरधाव वेगाने रिक्षा चालवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना सापळा लावुन पोलीस पथकाने आरोपी गणेशला अत्यंत शिताफीने रिक्षासह ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये त्याने ताब्यातील रिक्षा MH 14 CU 0481 ही रुपीनगर परिसरातुन चोरल्याची कबुली दिली. आरोपी गणेश हा सराईत चोरटा असल्याने त्यास अत्यंत विश्वासात घेऊन कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातुन व कोथरुड येथुन एकूण ०४ प्रवाशी वाहतुकीच्या रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरल्याची कबुली दिली. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याविरुध्द यापुर्वी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपी हा हॅन्डल लॉक नसलेल्या, निर्जनस्थळी पार्कीग केलेल्या प्रवाशी वाहतूकीच्या रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरी करीत होता. चोरीच्या रिक्षा अशिक्षीत लोकांना विक्री करुन पैसे कमविण्याचे प्रयत्नात असतांना त्यास गुन्हे शाखेकडून पकडण्यात आले आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी, हॅन्डल लॉक करुन पार्कंग करावीत व संशयित इसमांबाबत तात्काळ नियंत्रण कक्षाला माहीती कळवावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.














