न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दराबरोबर गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उद्योनगरीसह ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. एक मे या एकाच दिवशीच अनुदानित सिलेंडरचा दर सहा रुपयांनी वाढला आहे. तसेच, व्यवसायिक सिलेंडरचेही दर गगनाला भिडल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. यामुळे, देशभरातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेला महागाईचा झटका दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने होत असलेल्या इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्या पाठोपाठ आता गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. विरोधी पक्षात असताना इंधनाच्या किंमतीवरून सत्ताधाऱ्याना अडचणीत आणणा-या भाजपा सरकारने मात्र, सातत्याने दरवाढ करत नागरिकांचा अपेक्षाभंग केला आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत गॅसचा दर ६९७.५० रुपये होता. यामध्ये सहा रुपयांनी वाढ करण्यात आल्याने गॅसचा दर ७०३. ५५ रुपयांवर पोहोचला आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ करतानाच व्यवसायिक सिलेंडरचा दर मात्र, जैसे थे ठेवण्यात आला आहे. सध्या व्यवसायिक सिलेंडरचा दर १२४० रुपये आहे. उज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला आहे. मात्र, सतत गॅस सिलिंडरचे भाव वाढत असल्याचे या योजनेत सहभागी झालेल्या गरीब कुटुंबातील महिला गॅसपेक्षा आपली चूलच बरी म्हणताना दिसून येत आहेत. इंधनाचे दर वाढत असल्याने त्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असल्याने सर्वसामान्य जनता मात्र, महागाईने हैराण झाल्याचे दिसून येत आहे.











