- दापोडी ते पिंपरी मार्गावरील जागा तशाच पडून..
- महापालिकेचा राज्य शासनाला पत्रव्यवहार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पिंपरी ते निगडी मार्गावरील निगडी आणि आकुर्डी येथील विविध एकूण १५ जागांची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागणी केली आहे. त्यातील बहुतांश जागा कायमस्वरूपी देण्याबाबत मेट्रोने आग्रह धरला आहे.
दापोडी ते पिंपरी मार्गावर मेट्रोची मार्गिका तयार झाली आहे. त्यासाठी पालिकेने मोक्याच्या ठिकाणच्या दहा जागा महामेट्रोला दिल्या आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी अद्याप महामेट्रोने पार्किंग झोन विकसित केलेला नाही. त्यामुळे पार्किंगची समस्या जैसे थे आहे.
पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रो मार्गिका, स्टेशन, स्टेशनचे प्रवेशद्वार, जिना आणि लिफ्टसाठी तसेच, पार्किंगसाठी महामेट्रोने पालिकेकडे १५ जागांची मागणी आहे. तसेच, एमआयडीसी आणि खासगी जागा मालकांकडे जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे. पालिकेकडे मागण्यात आलेल्या जागांमध्ये निगडी बस टर्मिनल येथील सहा जागा आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३,५६२.२९३ चौरस मीटर आहे. निगडी येथील रिकामी जागा व पदपथाची अशा दोन जागा त्यांना हव्या आहेत. त्याचे क्षेत्रफळ ६१६.४५ चौरस मीटर आहे. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलामआझाद विद्यालयाच्या एकूण २८५.३३ चौरस मीटर अशा दोन जागा, आकुर्डी येथील पदपथाच्या पाच वेगवेगळ्या जागा (क्षेत्रफळ ४१९.१६ चौ.मी) मेट्रोला हव्या आहेत. अशी ४ हजार ८८४ चौरस मीटर जागा महामेट्रोने मागितली आहे. त्यातील बहुतांश जागा या कायमस्वरूपी देण्याची मागणी केली आहे.
महामेट्रोकडून चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पूल ते निगडीपर्यंत ४.४१ किलोमीटर अंतराचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ५७ झाडे हटविण्यात येत आहेत. तसेच, पदपथावरील विद्युत दिव्यांचे खांब आणि सिग्नलचे खांब हटविण्यासही सरुवात झाली आहे. निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात पहिला पिलर उभारण्यात आला आहे.
मेट्रोचे चार स्टेशन असणार…
पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रोचे चार स्टेशन असणार आहेत. चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलिस स्टेशनसमोर चिंचवडचे मेट्रो स्टेशन असणार आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात मेट्रोचे स्टेशन असेल. निगडी येथील टिळक चौकात मेट्रोचे तिसरे स्टेशन असणार आहे. तर, निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पीएमपी आगारात शेवटचे मेट्रो स्टेशन असणार आहे. स्टेशनच्या उभारण्यासाठी त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरील पदपथाची जागा मेट्रोला हवी आहे.
महोमेट्रोने पिंपरी ते निगडी मार्गावरील विविध १५ जागांची मागणी पालिकेकडे केली आहे. त्या जागा मेट्रोला भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील मूल्यांकन करून दर ठरविण्यासाठी नगर रचना विभागास पत्र दिले आहे. त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे पालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मुकेश कोळप यांनी सांगितले.














