- शहर भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, तळवडे, चिखली, मोशी, रावेत, दिघी, बोपखेल, कासारवाडी, दापोडी परिसरात रेड झोन आहे. संरक्षण क्षेत्रात बाधित जागा २००० यार्ड घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित नागरिकांना बांधकाम परवानगी मिळत नाही. बँका लोन देत नाहीत. नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. तसेच भूखंडाचा खरेदी विक्री व्यवहार होत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून रेड झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन, मोर्चा काढण्यात आला. त्याला यश मिळाले नाही. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या सप्टेंबर महिन्यात तीन तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
पुणे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी मध्यस्थी करून पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन बाधित शिष्टमंडळाची राष्ट्रपतींसोबत भेट घडवून आणावी. रेड झोन बाधित जागा ५०० मीटर करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे. जेणेकरून रेड झोनचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशा आशयाचे निवेदन शहर भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


















