न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगार रोहित प्रवीण धनवे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख रोहित प्रवीण धनवे (वय २१, रा. नेहरूनगर, पिंपरी), सागर अशोक पंडित (वय २५, रा. खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी), दिलीप उर्फ पाजी उर्फ सरदार इंद्रजीत चव्हाण (रा. नेहरूनगर, पिंपरी) व अल्पवयीन मुलगा हे ३ जुलैला भोसरीतील खंडेवस्ती येथे विनोद राज बहाद्दर विश्वकर्मा यांच्या भंगार दुकानावर आले. विनोद यांना शिवीगाळ करीत दुकानातील पैशांबाबत विचारणा करून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यांच्या खिशातील २२ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान या टोळीने संघटितपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली.
रोहित घनवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीची या भागात दहशत असून या टोळीने परिसरातील नागरिकांना अनेक वेळा त्रास दिला आहे. परंतु, त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणाही पुढे येत नव्हते. तरी, या टोळीने यापूर्वी कोणास त्रास दिला असल्यास अथवा कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.