न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- बांधकाम व्यावसायिकाला आता प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी गुणवतेचे हमीपत्र देण्याचे बंधन ‘महारेरा’ने केले आहे. त्यासाठी कायद्यातही बदल केले आहेत. गुणवत्ता हमीचे प्रमाणपत्र व्यावसायिकांनी स्वतः प्रमाणित करून सादर करावे लागेल. यामुळे व्यावसायिकाची जबाबदारी वाढून ग्राहकांना चांगल्या गुणवतेची घरे मिळण्यास मदत होणार आहे.
हमीपत्रात प्रकल्पाचे संरचना संकल्पन (स्ट्रक्चरल डिझाइन), स्थिरता व चाचण्या, वापरलेले साहित्य, मनुष्यबळाची कुशलता अशा गुणवत्ता पूर्वक विविध बाबींचा समावेश असेल. दोष दायित्व कालावधीच्या तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाला हस्तांतरणापासून ५ वर्षांपर्यंत स्वखर्चाने ३० दिवसांत त्रुटी दुरुस्त करून द्याव्या लागतात.
ग्राहकहित जपले जात असले, तरी तशी वेळच येऊ नये, अशी ‘महारेरा’ची भूमिका आहे. बांधकामांबाबत प्रमाणित कार्यपद्धती, मानके ठरविण्यासाठी ‘महारेरा’ने डिसेंबरमध्ये सल्लामसलत प्रस्ताव जाहीर केला. त्यावर आलेल्या प्रतिसादावर आधारित सविस्तर तरतुदींबाबत प्रस्तावित परिपत्रक २४ एप्रिलला जाहीर करून त्यावर २३ मे पर्यंत सूचना, मते मागविली होती. आलेल्या सूचना, मते आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून हे ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ अंतिम करण्यात आले आहे.
नवीन प्रकल्पांतील घरात प्रत्यक्ष राहायला गेल्यानंतर काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी दोषदायित्व कालावधीच्या तरतुदींची गरजच पडू नये, असा ‘महारेरा’चा प्रयत्न आहे.
– अजोय मेहता, अध्यक्ष, ‘महारेरा’…











