- आयएमएतर्फे सुरक्षित मातृत्व दिन साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वूमन डॉक्टर्स विंग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित मातृत्व दिना’ चे औचीत्य साधून तालेरा रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माता बाल संगोपन आधिकारी डॉ वर्षा डांगे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ मीनाक्षी क्षीरसागर, आय. एम. ए. चे विश्वस्त डॉ. दिलीप कामत, अध्यक्ष डॉ. सुहास माटे, माजी अध्यक्ष डॉ संजय देवधर, उपाध्यक्ष डॉ. संजीव दात्ये, सचिव डॉ. सुधीर भालेराव, वूमन विंगच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी गरोदरपणात घ्यावी लागणारी काळजी, वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे, योग्य वेळी लसीकरण करणे, रक्ताच्या चाचण्या करणे दोन मुलांमधील अंतर ठेवण्यासाठी गर्भनिरोधक साधने वापरणे, प्रसूती सुसज्ज हॉस्पिटल करणे, योग्य आराम, पोषक आहार, व्यायाम आणि प्रसूती पश्चात स्तनपान करणे इत्यादी महत्वाच्या विषयावर माता बाल संगोपन आधिकरी डॉ वर्षा डांगे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
त्याचवेळी आय. एम. ए. पी. सी. बी. वूमन्स विंगतर्फे ‘एक पाउल सुरक्षित मातृत्वाकडे” या विषयी मार्गदर्शन करणारी छोटी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सर्व गर्भवती महिलांना एक फळ आणि राजगिरा लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अर्चना जाधव यांनी केले व वूमन्स विंगच्या सचिव डॉ सारिका लोणकर यांनी आभार मानले.











