न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२४) :- एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे, कॉर्पोरेट लायसन्स, व्हेंडर कोड काढून देणे, तसेच कंपन्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमीष दाखवून टेंडरमध्ये गुंतवणूक केल्यास महिना २० टक्क्यापर्यंत आकर्षक नफा व परतावा मिळेल असे आश्वासन व प्रलोभन तिघांनी दाखविले. एकाने सुरवातीस तो सेन्ट्रल मिनीस्ट्रीतील कर्मचारी असून पुणे विभागातील एमआयडीसीतील कंपन्यांवर त्यांचा होल्ड आहे, असे भासवले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची मिनीस्ट्री ऑफ डेव्ही इंडस्ट्री (भारत सरकार) येथे संचालक पदावर निवड झाली आहे, असे खोटे सांगून व भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
दरम्यान फिर्यादीकडून बँक खात्याद्वारे व रोख असे एकूण १०,५८,५०,०००/- रूपये गुंतवणूक तिघांनी स्विकारली. रक्कम प्रत्यक्षात टेंडरमध्ये न गुंतवता तसेच कंपन्यांचे व्यापारी परवाने व व्हेंडर कोड काढण्यासाठी न वापरता आरोपींनी स्वतःच्या फायदयाकरीता वापरली. आज रोजी पर्यंत नफा म्हणून बँक खात्यावर २,५०,०५,०००/- रूपये व रोख स्वरूपात २,२५,००,०००/- रूपये, असा एकूण नफा ४,७५,६५,०००/- रूपये दिला. तसेच मुद्दल १,१६,००,०००/- रूपये आणि समजुतीच्या करारनाम्यानुसार २५,५०,०००/- रूपये फिर्यादीस परत केले. अशाप्रकारे एकूण ६,१७,१५,०००/- रूपये रक्कम परत करून उर्वरीत ४,४१,३५,०००/- रूपये रक्कम व आश्वासित केलेल्या परताव्याची रक्कम आरोपींनी स्वत:च्या फायदयाकरीता वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२५/०२/२०२१ पासून ते सप्टेंबर २०२२) दरम्यान शॉप क्रमांक-२, सेंट्रल प्राईड सोसायटी, गट नंबर १३, नवीन आळंदी देहू रोड, मु.पो.मोशी, ता-हवेली पुणे येथे आणि अशोका हॉटेल, नाशिक फाटा, कासारवाडी पुणे या ठिकाणी घडला.
संजय रामचंद्र हजारे (वय ५० वर्ष रा. मोशी) यांनी आरोपी १) ओंकार श्यामराव जोशी (राहणार- फ्लॅट क्र ७०२, बी विंग, ओरिएट सोसायटी ७६, काटे वस्ती जवळ पिंपळे सौदागर), २) सदाशिव नामदेव पुंड (फ्लॅट कमांक ३०७, सेंटल प्राईड सोसायटी, गट नं १३, नवीन आळंदी देहू रोड, मु पो मोशी, ता- हवेली, पुणे) ३) नवज्योज सरतापे (रा. अशोक क्लासेस जवळ, ज्ञानेश्वर पार्क १ जवळ पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ४४६/२०२४, भा.दं. वि. कलम १७०,४०६,४१९,४२०, ५०६,३४ सह एमपीआयडी कलम ३,४ अन्वये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि सत्यवान भुयारकर आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत.
















