न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२४) :- वैभवशाली गणेशोत्सव शनिवारपासून (दि. ७) सुरू होत असून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारनंतरही करता येऊ शकेल.
गणेशोत्सव शनिवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. यावर्षी गणेशोत्सव दहाऐवजी अकरा दिवसांचा आहे. शनिवारी (दि.७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ०४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५१ मिनिटांपर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टिकरण (भद्रा) तसेच राहुकाल वर्ज्य नाही. कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हीनंतरही करता येऊ शकेल, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’ चे मोहन दाते यांनी दिली.
पूजा आणि मूर्ती अशी असावी …
आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस दररोज गणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास सांगते. विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.
















