- मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ तर, पीएमपीच्या ८०० जादा बसेसची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२४) :- गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. तसेच पीएमपी प्रशासनाने शेड्युलच्या गाड्यासह सुमारे ८०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘यात्रा स्पेशल’ या नावाने या बस धावतील. दुसऱ्या शिफ्टनंतर धावणाऱ्या या बसचा प्रवास पाच रुपयांनी महाग होणार आहे. दोन टप्प्यात या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
मेट्रोची सेवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. शनिवार (७ सप्टेंबर) ते सोमवार (९ सप्टेंबर) या दोन दिवसात मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील. तर, मंगळवार (१० सप्टेंबर) ते सोमवार (१६ सप्टेंबर) या कालावधीत सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तर, सध्याच्या तिकीट दरात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच रात्री १२ नंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मध्यवर्ती पुण्यातील रस्ता वाहतूक बंद झाल्यावर पर्यायी रस्त्याने पीएमपीच्या बसेसची वाहतूक केली जाणार आहे. शिवाय जादा बसेसची वाहतूक देखील केली जाणार असल्याचे पीएमपीने सांगितले आहे. यामध्ये पहिला टप्पा म्हणजेच ९, १० आणि १६ सप्टेंबर रोजी १६८ जादा बसेस धावतील. तसेच ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान ६२० जादा बसेस धावणार आहेत.
















