- एक हजारांपेक्षा अधिक दस्त नोंदणीवर आक्षेप..
- अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची लागणार खातेनिहाय चौकशी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२४) :- पुणे व मुंबईमधील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ‘महारेरा’, तुकडेबंदी कायद्यानुसार दस्तनोंदणी होत नसल्याच्या संशयानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या पडताळणीत ७२० दस्तांमध्ये कमी रकमेचे मुद्रांक शुल्क भरल्याचे आढळले आहे. सुमारे १ हजाराहून अधिक नियमबाह्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यातून राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याने दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिली. आतापर्यंत पुण्यातील कार्यालयांची तपासणी पूर्ण झाली असून, तपासणीचा अंतरिम अहवाल सरकारला पाठविण्यात आला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ हवेली १७, हवेली ६, हवेली ८ दुय्यम निबंधक श्रेणी २ खेड १ खेड २ खेड ३ या सहा कार्यालयांमधील तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये १ हजार ३२२ दस्तांमध्ये आक्षेप आढळले आहेत. त्यापैकी ४६६ दस्त कमी मूल्यांकनाचे, तर उर्वरित ८५६ दस्तांमधून नोंदणी कायद्याचा भंग झाल्याचे आढळले आहे. तर मुंबईमध्ये ४४८ दस्त आक्षेपार्ह आढळले असून त्यापैकी २५४ दस्त कमी मूल्यांकन व ९१४ दस्तांमध्ये नोंदणी कायचाचा भंग असल्याचे आढळले आहे.
बनावट एनए, महारेराची बनावट प्रमाणपत्रे आणि तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्याच्या कलम ४४ चे उल्लंघन करून दस्त नोंदणी सुरू असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या सचिवांनी ७ फेब्रुवारीला नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रकांना पुणे व मुंबईतील दस्त तपासणीचा आदेश दिला होता. त्यानुसार एप्रिलपासून पुण्यासह मुंबईतील दुष्यम निबंधक कार्यालयांत दस्तांची तपासणी करण्यात सुरू आहे. यासाठी २०१९ ते २०२४ पर्यंतच्या सुमारे ३५ लाख दस्तांची तपासणी सुरु आहे.
पथकांच्या अहवालात काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत. अशा सर्व दस्तांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. यातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. याचा अंतरिम अहवाल सरकारला पाठविला आहे.
– हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक…
















