न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- महापालिकेच्या वतीने अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन दिले जाते. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था निश्चित केली जाते. मात्र, पदोन्नती झालेले काही अधिकारी परवानगी न घेता परस्पर नव्या दालनाचा ताबा घेत आहेत. त्यावरून अधिकारी खासगीत रोष व्यक्त करीत आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे व इतर वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. रिक्त जागांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अनेकजण कार्यकारी अभियंता झाले आहेत. पदोन्नती झालेले अधिकारी नवे व प्रशस्त दालन मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. समितीची मान्यता मिळण्याआधीच अनेक जण दालन ताब्यात घेत असल्याने दालन हा महापालिकेतील चर्चेचा विषय उरला आहे
महापालिकेच्या आसन व्यवस्था समितीच्या बैठकीत कोणते अधिकारी कोठे बसणार याचा निर्णय होतो. मात्र, त्या समितीची मान्यता नसताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःचे सुसज्ज दालन असताना दोन दालनांवर कब्जा केला आहे. तेथे स्वतःचा नामफलकही लावला आहे. नव्या दालनात पूजापाठही करून घेण्यात आल्याची चर्चा आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आसन व दालन निश्चित करण्यासाठी आसन व्यवस्था समिती आहे. त्याचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आहेत. त्यात शहर अभियंता मकरंद निकम, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी व अन्य अधिकारी सदस्य आहेत. त्या समितीने निर्णय घेतल्यानंतर संबंधित अधिकारी कोठे बसणार याचा निर्णय होतो.
समितीच्या बैठकीत मुख्य अभियंता क्रमांक एक व दोन तसेच, सहशहर अभियंता या पदांवरील अधिकाऱ्याच्या दालनाचा निर्णय झालेला नाही. परस्पर कोणी कोणत्याही दालनाचा ताबा घेत असल्यास कारवाई केली जाईल.
– विठ्ठल जोशी, सदस्य, आसन व्यवस्था समिती…
















