न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- ‘गणपती बाप्पा मोरया…’ गजरात घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला पिंपरी चिंचवडकरांनी रविवारी निरोप दिला. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
नोकरदार वर्गामध्ये दीड दिवसासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दुपारपासून पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी सायंकाळच्यावेळी विसर्जनासाठी भाविक येताना दिसत होते. तर अधून- मधून पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी गणपतीवर धरलेल्या छत्र्या सावरत, गणेशमूर्तींवर प्लास्टिकचे आच्छादन घालून गणेश तलाव, रावेत जाधव घाट, चिंचवड थेरगाव घाट, मोरया घाट, काळेवाडी घाट, पिंपरी घाट यांच्यासह एकूण ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती.
त्याठिकाणी वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पथक, नदी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम हौदही तयार केले आहेत. तसेच नदी घाटावर अग्निशामक दलाचे आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. विसर्जनस्थळी बाप्पाला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते. ऋषिपंचमी निमित्त चिंचवड गावातील पवना, मुळा आणि इंद्रायणी तीरी महिलांनी पूजाही केली. चिंचवड मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
















