न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपआयुक्तपदी फ क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सीताराम बहुरे यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्याच्या विषयास आज प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून उपआयुक्त पदावर नेमणूक केली जाते.
महापालिका आस्थापनेवर उपआयुक्त अभिनामाचे पद रिक्त आहे. या पदासाठी आवश्यक अर्हता धारण करणारे सीताराम बहुरे यांची पदोन्नतीने उपआयुक्त पदावर नेमणूक करण्यासाठी महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आज विशेष बैठक संपन्न झाली, त्या बैठकीमध्ये स्थायी तसेच महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.त्यामध्ये पदोन्नतीच्या विषयाचादेखील समावेश होता.
















