न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- शहराला भारतातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असतो. शहरातील नागरिक ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेत असतात, अशा शब्दांत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचेप्रतीही कृतज्ञता व आभार व्यक्त केले आणि महापालिकेच्या ‘ स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात देखील शहरातील नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी ७ वाजता भोसरी येथील सी सर्कल, स्पाईन रोड या ठिकाणी पार पडला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात ब्रॅड अॅम्बेसिडर तसेच सफाई सेवक आणि सफाई सेविकांचा आयुक्त शेखर सिंह आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ब्रँड अँम्बेसीडर पूजा शेलार, सुरेश डोळस, संगीता जोशी, अदिती निकम, यशवंत कन्हेरे,पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे,सचिव प्रमोद राणे यांच्यासह सहायक आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवर्षी स्वच्छतेच्या बाबतीत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत आपला १० वा क्रमांक होता,आता आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.











