न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- ऑटो रिक्षा व मीटर्ड टॅक्सीचालक-मालकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्स टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील अनेक ऑटो रिक्षा संघटनांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती.
यासाठी बऱ्याच वेळा आंदोलनही करण्यात आले होते. १६ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार मंडळाची स्थापना करण्यात आली असून, परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविणे व केंद्र आणि राज्याच्या कल्याणकारी योजनांचा लाभ चाळीस हजारांहून अधिक परवानाधारक रिक्षाचालकांना लाभ मिळणार आहे.
चालकांनी योजनांच्या लाभासाठी अर्ज करणे आवश्यक राहील. सभासद नोंदणीकरिता ऑनलाइनप्रणाली विकसित करण्यात येत असून, संबंधित प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
बॅज बंधनकारक असणार
मंडळाच्या सभासदत्वासाठी अर्जदाराकडे राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा, मीटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व बॅज असणे बंधनकारक राहील, नोंदणीकृत चालकांना मंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येईल.
















