न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- विनापरवाना वृक्षतोड करून लाकडांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभागाच्या चार कर्मचाऱ्यांचे केलेले सेवानिलंबन रद्द करण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांवरील कारवाई शिथिल करून त्यांना केवळ सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा असा प्रकार केल्यास कठोर कारवाई करण्यात येण्याची तंबी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.
उद्यान असिस्टंट विभागाचे हॉर्टीकल्चर सुपरवायझर संतोष भिमाजी लांडगे यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई रद्द करत त्यांची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. उद्यान सहाय्यक (माळी) मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी आणि असिस्टंट हॉर्टीकल्चर सुपरवायझर संजीव प्रल्हाद राक्षे यांना अशी चूक पुन्हा न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
संतोष लांडगे यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता, खासगी यंत्रणेमार्फत एकूण ६४ झाडांची कत्तल केली होती. त्यात सुबाभळाची ५८, कांचनची २, कडुलिंबाची २, पिंपळाचे एक तसेच, कांचनचे एक या जातीच्या झाडांची तोड करुन ती लाकडे उद्यान विभागात जमा न करता परस्पर बाहेर विकली असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी लांडगे यांची सेवा निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी एक लाख चार हजार रुपयांचा भरणा करून शिक्षा न करण्याची विनंती केली. त्यांच्यावरील दोषारोप शाबीत झाल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
















