- रुपीनगर परिसरातील विस्कळीत वीजपुरवठ्यावर अधिकाऱ्यांची तातडीने बैठक..
- अखंडित वीजपुरवठा आणि देखभाल दुरुस्तीच्या अधिकाऱ्यांना सूचना..
- शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे यांच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२४) :- रुपीनगर तळवडे परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देताच महावितरण प्रशासनाला जाग आली. महावितरणच्या गणेश खिंड कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्वरित वीज समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना फर्मान सोडण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच परिसरातील वीज समस्या सुटतील आणि विनाखंडीत वीजपुरवठा सुरु होईल, अशी माहिती रुपीनगर तळवडे शाखेचे शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे यांनी दिली आहे.
नितीन बोंडे म्हणाले, रुपीनगर तळवडे भागात गेल्या काही महिन्यांपासून वीज समस्यांनी नागरिक हैराण झाले होते. सतत पाच ते आठ तासापर्यंत वीजपुरवठा बंद होत असे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. याची दखल घेऊन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे अनियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली होती. धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. अखरेस त्याची दखल घेतली गेली. महावितरणच्या गणेश खिंड कार्यालयात नुकतीच वीज समस्यांवर आमची सकारात्मक बैठक पार पडली.
यावेळी अधीक्षक अभियंता गायकवाड, भोसरीचे कार्यकारी अभियंता देवकर, प्राधिकरण येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सरोदे, तळवडे येथील सहाय्यक अभियंता बनसोडे, रुपीनगर तळवडे शाखेचे शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक दादासाहेब नरळे, विभाग संघटिका सुजाता काटे, महिला संघटिका आशा भालेकर, उपविभाग प्रमुख गणेश भिंगारे, आतिश जाधव, शाखाप्रमुख सर्जेराव कचरे, सुजित साळवी. उपशाखाप्रमुख कैलास तोडकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अमित शिंदे, युवा सेना समन्वय सुनील समगिर, युवा सेना संघटक प्रवीण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे, भरत शिंदे, जमीर मुल्ला, नसिर शेख, अभिजीत पाटील, अक्षय चौधरी, कुमार मारणे, मंदार जोशी आदींनी बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीत प्रभागातील फ्युज अद्ययावत करणे, रुपी सोसायटी, त्रिमूर्ती सोसायटीत नवीन केबल, मिनी बॉक्सद्वारे वीजपुरवठा सुरळीत करणे, नादुरुस्त एल टी केबल बदलणे, श्रीराम कॉलनी, घारजाई सोसायटी, गणेश कॉलनीत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, काही ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, मुख्य लाईनबाबत उपाययोजना करणे, दुसऱ्या भागातून रुपीनगर तळवडेसाठी वीजपुरवठा घेता येईल का? यावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, तळवडे या भागासाठी नवीन फिडर बसवण्यात येईल. कॅनबे चौक येथे नवीन स्विचिंग स्टेशन उभारण्यात येईल. अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेजारील भागातून वीजपुरवठा घेता येतो का? ते तपासण्याचे आदेश सहाय्यक अभियंता यांना दिले आहेत.
मा. गायकवाड, अधीक्षक अभियंता – महावितरण, पुणे…
















