- अण्णांची जादूची कांडी गंजली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२४) :- विद्यमान आमदारांना सुशिक्षित मतदारांसह पक्षांतर्गत विरोध, पक्षसंघटन करण्यात आलेले अपयश, ‘अॅन्टी इन्कम्बन्सी’ आणि निष्क्रियता भोवणार असल्याची भीती असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पिंपरीत नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. त्यातच महायुतीतील भाजपनेही पिंपरीच्या जागेसाठी आग्रह धरल्याने पवार सावध झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून वाट्याला येणारी ही एकमेव जागा सोडण्याची त्यांची तयारी नसून, ते भाकरी परतणार का, याकडे महायुतीचे लक्ष लागले आहे.
शहरातील पिंपरी मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे येथून इच्छुक असणाऱ्या खुल्या गटातील नेत्यांचा हिरमोड झाला. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीने अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. संधी साधण्यात पटाईत असणारे बनसोडे धूर्त राजकारणी समजले जातात. मात्र महापालिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून अर्थव्यवहार रेटून नेणारे बनसोडे आमदार झाल्यावर हवेत गेल्याचे कार्यकर्ते बोलू लागले. परिणामी २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा दणका बसला. त्यानंतरही ते जमिनीवर आले नाहीत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झालेली नव्हती. पक्षातील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना ते जुमानत नव्हते. मित्रपक्षांशीही त्यांचा छत्तीसचा आकडा होता. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांना पक्षातून कडाडून विरोध झाला. अखेर राष्ट्रवादीने सुलक्षणा शीलवंत- धर यांना उमेदवारीसोबत ‘एबी’ फॉर्म दिला. मात्र बनसोडेंनी त्याच रात्री जादूची कांडी फिरवून स्वतःसाठीही ‘एबी’ फॉर्म मिळवला. सकाळी निवडणूक कार्यालय उघडण्याआधीच ते तेथे पोहोचले आणि अर्ज भरला. राष्ट्रवादीचे ते अधिकृत उमेदवार ठरले. नंतर पक्षाने त्यांचा प्रचार करून निवडून आणले. त्यानंतर तर त्यांचे विमान आणखी हवेत गेल्याच्या तक्रारी पक्षातूनच होऊ लागल्या. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते कधीच सोबत घेत नसल्याने त्यांचाही विरोध आहे. अजित पवार महायुतीत गेल्यानंतर बनसोडे यांनी इतरत्र चाचपणी केली, मात्र त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे ते पवार यांनाच धरून राहिले.
झोपडपट्टीतील मतदारांना भुलवण्याचे कौशल्य बनसोडेंकडे असल्याचे बोलले जाते. विकासकामांपेक्षा मतदानाच्या आधी काही रात्री चालणाऱ्या खेळावर त्यांचा भर असतो. शहरातील मध्यवर्ती भागात असलेला पिंपरी मतदारसंघ त्यामुळेच विकासापासून वंचित राहिला आहे. मतदारांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरल्याचे दिसलेले नाही. आमदारांभोवतीचे कोंडाळे आणि त्यांच्या कारभारावर सुशिक्षित, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय मतदार नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यातच दोनवेळा निवडून गेल्यानंतर मतदारांत निर्माण झालेली प्रस्थापितांविरोधातील नाराजीही यंदा दिसत आहे. यामुळे अजित पवारांनी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
आमदार बनसोडे पक्षाच्या कार्यकत्यांनाही भेटत नसल्याचे कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतील नेते सांगतात. केवळ अजित पवार आल्यावरच पक्षाच्या कार्यक्रमांत ते व्यासपीठावर दिसतात. पक्षसंघटन करण्यात ते अपयशी ठरल्यानेच कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात, गटात जात आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर पक्षाचे मेळावे, कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसत नाही. सत्तेत असलेल्या स्वतःच्या पक्षाच्या कामाचा प्रचारही त्यांच्याकडून झालेला नाही. मतदारांसह पक्षाच्या कार्यकत्यांनाही आमदार बनसोडे भेटत नाहीत. त्यामुळे ‘आमदार बनसोडे दाखवा, हजार रुपये मिळवा अशा उपहासात्मक प्रतिक्रिया ऐकू येतात. मधल्या काळात आमदारांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी करण्यात आली. त्यावेळी पहिल्यांदाच बनसोडेंचा चेहरा फलकावर दिसल्याचे महायुतीचे कार्यकर्ते सांगत होते. पिंपरीत किरकोळ कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यापारी-उद्योजकांकडून होणारी ‘वसुली कोणासाठी होते, असाही सवाल हे कार्यकर्ते करत असतात.
पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांचा गट अतिशय प्रबळ होता. मात्र २०१४ नंतर तो कमकुवत होत गेला. आमदार बनसोडे यांच्यामुळे त्यात भर पडल्याचा अहवाल पक्षाला देण्यात आला आहे. महायुतीच्या जागावाटपात शहरातील तीन मतदारसंघांपैकी एकमेव पिंपरीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीत ती गमावली तर गटच संपण्याची भीती पवार यांना असल्याने त्यांनी भाकरी परतण्याची तयारी केल्याचे बोलले जाते.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वांत तगडा पक्ष म्हणून भाजपची गणना होते. चिंचवड आणि भोसरीसह पिंपरीतही पक्ष मजबूत असल्याने आणि पक्षाकडे सक्षम चेहरे असल्याने भाजपने दावा केला आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी तिन्ही जागांची मागणी करत हा दावा बळकट केला आहे. त्यांनी शहरातील महायुतीच्या तिन्ही जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
















