न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवडचे पोलीस एपीआय प्रवीण स्वामींच्या अंगावर एका आरोपीने थेट गाडी घातली. जयपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एकाला अटकेची भीती दाखवून आरोपी अक्षीत आणि त्याचा साथीदार मयांक गोयल या दोघांनी एक कोटी आठ लाखांना गंडा घातला. या प्रकरणात अक्षीत आणि मयांकला बेड्या ठोकण्यासाठी एपीआय प्रवीण स्वामी पथकासह जयपूरला गेले होते. स्वामींच्या पथकाने मयांकला सापळा रचून अटक केली, त्याच्या मार्फत ते अक्षीत पर्यंत पोहचले. मात्र, एका ठिकाणी अक्षीत काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसला होता.
स्वामींच्या पथकाने स्कॉर्पिओला घेरलं. गाडी चालू स्थितीत होती, अक्षीत बाजूच्या सीटवर होता, स्टेरिंग चालकाच्या हाती होतं. हे पाहता ते पळ काढू शकतात. ही शक्यता गृहीत धरून स्वामी गाडी समोरचं उभे राहिले. मात्र, अक्षीतने चालकाला गाडी अंगावर घालण्याच्या सूचना दिल्या. चालकाने ही पुढचा मागचा विचार न करता, थेट स्वामींच्या अंगावर गाडी घातली. स्वामींनी त्यांना रोखण्यासाठी बोनेट वर उडी घेतली, मात्र गाडीचा वेग वाढल्यानं ते बाजूला फेकले गेले. याप्रकरणी अक्षीत आणि चालकावर जयपूरमध्येचं हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












